उद्धव ठाकरेंना उच्च न्यायालयाचा मोठा दणका ! शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबतची याचिका फेटाळली !!
उच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला या प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश

- शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंची याचिका फेटाळली
नवी दिल्ली, 15 नोव्हेंबर – शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास बंदी घालण्याच्या निवडणूक आयोगाच्या अंतरिम आदेशाविरोधात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी फेटाळून लावली.
न्यायमूर्ती संजीव नरुला म्हणाले की, शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आणि पक्षाच्या नावाचा वापर करण्याबाबत आयोगाची कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण व्हावी, हेच शिवसेना गट आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताचे ठरेल. उच्च न्यायालयाने आयोगाला प्रकरणावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश दिले.
सध्याची याचिका फेटाळण्यात आली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
या वर्षाच्या सुरुवातीला, महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री, एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारले आणि त्यांच्यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) सोबत “अनैसर्गिक युती” केल्याचा आरोप केला.
शिवसेनेचे 55 पैकी 40 हून अधिक आमदार शिंदे यांच्यासोबत गेले, त्यानंतर ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.
यानंतर शिंदे गटाने खरी शिवसेना असल्याचे सांगत पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा केला.
आयोगाने 8 ऑक्टोबर रोजी आपल्या अंतरिम आदेशात ठाकरे आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या दोन्ही गटांना मुंबईच्या अंधेरी मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यास प्रतिबंध केला.
आयोगाचा आदेश रद्द करण्याची मागणी करत ठाकरे यांनी गेल्या महिन्यात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
ठाकरे यांच्या अर्जावर तोंडी सुनावणीची विनंती करूनही आयोगाने सुनावणीची संधी न देता आदेश पारित करण्यात अवाजवी घाई केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.
ठाकरे यांनी आपल्या याचिकेत पक्षाचे निवडणूक चिन्ह हीच आपली ओळख असल्याचा दावा केला आहे, जो शिवसेनेने स्थापनेपासून वापरला आहे. पक्षाची स्थापना त्यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांनी 1966 मध्ये केली होती.