शाळेत दारू, मांसाहार पार्टी केल्याबद्दल शिक्षक निलंबित ! ग्रामस्थ पार्टीचा व्हिडिओ बनवत असताना शिक्षकाने चढवला हल्ला !!
शिवपुरी जिल्ह्यातील शाळेच्या आवारातील घटना

- या शिक्षकाने नियमितपणे शाळेच्या आवारात अशा पार्टीचे आयोजन केल्याची तक्रार प्राप्त झाली होती आणि अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
शिवपुरी, 2 नोव्हेंबर – मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील शाळेच्या आवारात मद्य आणि मांसाहारी भोजनाची पार्टी आयोजित करण्यासाठी सेवा आचार नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका सरकारी शाळेतील शिक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. एका अधिकाऱ्याने बुधवारी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील खनियाधना ब्लॉकमधील पोटा गावात सरकारी प्राथमिक शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या पार्टीचा व्हिडिओ सोमवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.
मंगळवारी या शिक्षकाला निलंबित करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. मात्र, ही पार्टी कधी झाली हे त्यांनी स्पष्ट केले नाही.
एका गावकऱ्याने आरोप केला की काही स्थानिक लोक पार्टीचा व्हिडिओ बनवत असताना शिक्षकाने त्यांच्यावर हल्ला चढवला.
जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक श्रीवास्तव यांनी सांगितले की, व्हिडिओ समोर आल्यानंतर या शिक्षकाला मंगळवारी तत्काळ निलंबित करण्यात आले.
अधिकारी म्हणाले की, शिक्षकाचे हे कृत्य सेवा आचार नियमांचे उल्लंघन आहे. गटशिक्षणाधिकारी आणि पिचोरे उपविभागीय दंडाधिकारी यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, या शिक्षकाने नियमितपणे शाळेच्या आवारात अशा पार्टीचे आयोजन केल्याची तक्रार प्राप्त झाली होती आणि अलीकडेच सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
सविस्तर चौकशीनंतर शिक्षकावर योग्य ती पावले उचलली जातील, असे या अधिकाऱ्याने सांगितले.