वाल्मिक कराडचा व्हिडियो व्हायरल, केला धक्कादायक खुलासा: संतोष भय्या देशमुख प्रकरणात राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जातय !

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१- संतोष भय्या देशमुख प्रकरणात राजकीय द्वेषापोटी माझं नाव जोडलं जातय असा दावा वाल्मिक कराडने केला आहे. पुण्यात सीआयडीला शरण जाण्यापूर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडियो तयार केला व त्यात त्याने हा दावा केला आहे.
सदर व्हिडियोत म्हटले आहे की, मी वाल्मिक कराड केज पोलिस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे. मला अटकपूर्वचा अधिकार असताना मी सीआयडी पुणे ऑफिस येथे सरेंडर होत आहे. संतोष भय्या देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी. राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे. पोलिस तपासात जे निष्कर्ष निघेल किंवा मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जी शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे.
सदरचा व्हिडियो प्रसारित झाल्यानंतर लगेच वाल्मिक कराड हा आज, ३१ डिसेंबर रोजी दुपारी पुणे सीआयडीला शरण गेला. त्यानंतर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली. दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी वाल्मिक कराडवर बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात वाल्मिक कराड मास्टरमाईंड असल्याचा आरोप झाल्यानंतर वाल्मिक कराड हा फरार होता.






























