महाराष्ट्र
Trending

आदर्श पतसंस्था ठेवीदारांचा संताप उसळला; इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

छत्रपती संभाजीनगर येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील आर्थिक गैरव्यवहारामुळे गेल्या तीन वर्षांपासून ठेवी अडकून पडलेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ठेवीदारांच्या मागण्यांसाठी एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली १ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक आणि मोठ्या संख्येने ठेवीदार सहभागी झाले होते.

आपली आयुष्यभराची बचत परत मिळावी, या मागणीसाठी आंदोलकांनी ‘थाली बजाओ’ आंदोलन करत सरकार आणि प्रशासनाविरोधात निषेध व्यक्त केला. आंदोलनादरम्यान तीन वर्षांहून अधिक काळ उलटूनही ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या ठेवी अद्याप परत मिळालेल्या नसल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली.

या प्रकरणातील प्रशासकीय प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप करत इम्तियाज जलील यांनी, मानसिक तणाव आणि प्रतीक्षेमुळे आतापर्यंत सुमारे ७५ ठेवीदारांचा मृत्यू झाल्याचा गंभीर दावा केला.

मोर्च्यानंतर इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत ठेवीदारांच्या समस्या मांडल्या आणि सविस्तर निवेदन सादर केले. या प्रकरणाची सुनावणी फास्टट्रॅक न्यायालयात घेऊन ठेवीदारांची अडकलेली रक्कम शक्य तितक्या लवकर परत मिळावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली.

यासोबतच प्रशासनाने या प्रकरणात तातडीने ठोस निर्णय न घेतल्यास संबंधित मंत्र्यांना थेट घेराव घालण्यात येईल, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला. हजारो ठेवीदारांना त्यांचे पैसे परत मिळेपर्यंत हा लढा अधिक तीव्रतेने सुरू ठेवला जाईल, असा विश्वास इम्तियाज जलील यांनी आंदोलनकर्त्यांना दिला.

Adarsh Nagari Sahakari Bank, Adarsh Nagari Bank Scam, Depositors Protest, Imtiaz Jaleel, Chhatrapati Sambhajinagar News, Cooperative Bank Scam, Maharashtra News

#AdarshNagariBank #BankScam #DepositorsProtest #ImtiazJaleel #MaharashtraNews

Back to top button
error: Content is protected !!