दिव्यांग कुटुंबाच्या घरावर जेसीबी संसार उध्वस्त,झाडांची कत्तल, कसलीही नोटीस न देता प्रशासनाची तोडक कारवाई

BEED | – बीडच्या पाटोदा शहरात एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. पारधी समाजातील दिव्यांग पवार कुटुंबाच्या घरावर अचानक जेसीबी फिरवण्यात आला. आणि त्यांचा संपूर्ण संसार काही क्षणांत उद्ध्वस्त झाला. घर तुटत असताना दिव्यांग व्यक्ती पोलिस अधिकाऱ्यांच्या पायावर लोळण घालत विनवणी करत होता. काळीज पिळवटून टाकणारा व्हिडिओ देखील समोर आला आहे. एवढंच नव्हे तर परिसरातील २५ ते ३० झाडांचीही निर्दय कत्तल करण्यात आली.
पाटोदा शहरातील सरकारी रुग्णालयाच्या पाठीमागे असलेल्या गायरान जमिनीवर आदिवासी पारधी कुटुंब गेल्या 30 वर्षापासून वास्तव्यास आहे. मात्र तहसील आणि पोलिस प्रशासनाकडून घरावर जेसीबीच्या सहायाने तोडक कारवाई करण्यात आली. छत उखडल्याने सध्या पारधी कुटुंब उघड्यावर आले आहे. आम्हाला कोणी वाली नाही का? आता आम्ही कुठे जायचे असा सवाल आदिवासी पारधी असलेल्या पीडित महिलांनी केला आहे.






























