एकाच रात्री दोन मोठ्या कंपन्यांवर डल्ला! 💰12 लाखांची धाडसी चोरी 🔥 सीसीटीव्हीत चोर कैद 🎥

BULDHANA | तलाव रोडवरील दोन मोठ्या कंपन्यांमध्ये १२ लाखांची धाडसी चोरी ; घटना सीसीटीव्हीत कैद बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील तलाव रोड परिसरात असलेल्या दोन मोठ्या प्रतिष्ठानांमध्ये चोरट्यांनी धाडसी घरफोडी केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. तलाव रोडवरील पार्ले बिस्कीट बनणाऱ्या शिवांगी बेकर्स आणि ओम शंकर ॲग्रो मिल या दोन्ही ठिकाणच्या ऑफिसमधून चोरट्यांनी लाखो रुपयांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास या दोन्ही कंपन्यांच्या आवारात प्रवेश केला.अत्यंत शिताफीने कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत,चोरट्यांनी तिजोरी व ड्रावरमध्ये ठेवलेली १२ लाख रुपयांची रोकड लंपास केली. सकाळी जेव्हा कर्मचारी कामावर आले, तेव्हा कार्यालयाचे दरवाजे तुटलेले आणि सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले.
त्यानंतर ही चोरी झाल्याचे समोर आले.घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला.कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, त्यामध्ये चोरटे कैद झाल्याचे दिसून येत आहे. या फुटेजच्या आधारे पोलीस आता आरोपींचा शोध घेत आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून शिवाजी नगर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आहेत. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.






























