माजी खासदार इम्तियाज जलील, मोहम्मद असरार, कुणाल खरातसह 50 जणांवर गुन्हा दाखल ! जमावबंदीचे उल्लंघन व मुक्या प्राण्याचा छळ केल्याची तक्रार !!

छत्रपती संभाजीनगर : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ AIMIM या पक्षाच्या वतीने पैठणगेट येथे निदर्शने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान जमावबंदीचा आदेश आणि मुक्या प्राण्याचा छळ झाल्याप्रकरणी क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यासह 50 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
शेख अर्शद शेख लाल ( पोलीस हवालदार, नेमणुक पोलीस ठाणे क्रांतीचौक, छत्रपती संभाजीनगर) यांनी दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, दिनांक 20/12/2024 रोजी 15:00 ते 16.00 वाजता पैठणगेट येथे AIMIM या पक्षाच्या वतीने मोहम्मद असरार मोहम्मद अकबर-शहर युवा अध्यक्ष व कुणाल गौतम खरात, महाराष्ट्र अध्यक्ष विद्यार्थी आघाडी यांच्या नेतृत्वात अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री, भारत सरकार यांनी दिनांक 17/12/2024 रोजी संसदेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बाबत केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ निदर्शने आंदोलन करण्यात आले. सदर निदर्शने कार्यक्रमाकरिता पोलिसांचा ताफा बंदोबस्त कामी हजर होता.
सदर निदर्शने कार्यक्रमात 1) मोहम्मद असरार मोहम्मद अकबर, रा. कटकटगेट, 2) कुणाल गौतम खरात, रा. नारळीबाग, 3) माजी खासदार सय्यद इम्तियाज जलील, रा. सत्यविष्णू हॉस्पिटल जवळ, एन-12, हडको, 4) नासेरउद्दीन सिध्दीकी, रा. एस.टी. कॉलनी, फाजलपुरा, 5) प्रांतोष गंगाराम वाघमारे, रा. किलेअर्क, 6) समिर कुरेशी, रा. सिल्लेखाना, 7) आरेफ हुसैनी, रा. शहाबाजार, 8) फिरोज खान, रा. नवाबपुरा, 9) मिर हिदायत अली, रा. शहाबाजार, 10) समिर साजेद (बिल्डर), रा. चेलीपुरा, 11) शेख जफर शेख अख्तर, रा. बायजीपुरा, 12) सुभाष वाघुले, रा. बेरीबाग, हर्सूल, 13) मोनिका मोहन मोरे, रा. बजाज हॉस्पिटल समोर सातारा परिसर, 14) सलिम पटेल (बोरगावकर), रा. बायजीपुरा, 15) रफत यारखान रा. मिल कॉर्नर, 16) अमजद खान उर्फ चाचु, रा. संजय नगर, बायजीपुरा, 17) विकास ऐडके, रा. खडकेश्वर, 18) काकासाहेब काकडे, 19) सुमित जमधडे, रा. बायजीपुरा, 20) डी. व्ही. खिल्लारे व इतर 20 ते 30 कार्यकर्ते सहभागी झाले होते. सदर निदर्शने कार्यक्रमात मुर्दाबाद, मुर्दाबाद, अमित शहा मुर्दाबाद, संविधान के सन्मान में, दलीत-मुस्लीम मैदान मे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद, भाजप सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. घोषणा सुरु असतांना प्रांतोष गंगाराम वाघमारे यांनी वेसन नसलेला एक मुका प्राणी पांढऱ्या रंगाचे गाढव त्याच्या गळ्यात दोरी बांधून आंदोलन स्थळी आणले आणी त्यानंतर त्यास आंदोलनस्थळी आणले व इतर कार्यकत्यांच्या मदतीने जबरदस्तीने पकडून ठेवून त्याचा छळ केला आणी त्यास क्रूरतेची वागणुक दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलीस आयुक्त, छत्रपती संभाजीनगर यांचे जमावबंदी आदेशाचे उल्लघंन केले तसेच वेसन नसलेल्या एका मुक्या प्राण्यास छळ करुन क्रूरतेची वागणुक दिली म्हणून क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल करण्यात आली आहे.