कुऱ्हाडीने डोक्यात सपासप घाव घालून पत्नीचा खून; पतीला जन्मठेपेची शिक्षा !
जालना जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

छत्रपती संभाजीनगर – जालना जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. पत्नीस जिवे ठार मारणा-या पतीस जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली. दिनांक ३०/१२/२०२४ रोजी प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना श्रीमती. वर्षा एम. मोहीते यांनी आरोपी मिलींद नारायण पाडेवार (वय २५ वर्ष रा. आंबेडकर नगर, परतुर ता. परतुर जि. जालना) यास पत्नीचा खून केल्या प्रकरणी कलम ३०२ भा.द.वी. मध्ये जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा ठोठावली.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक ३०/१०/२०२२ रोजी फिर्यादी हा सातोना (खु) ता. परतूर जि. जालना येथे भोरूभाई अन्सारी यांचे ट्रॅक्टरवर चालक म्हणुन कामास होतो. तेथे कामावर असतांना दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास लैला सय्यद हिने फिर्यादीस फोन करून सांगितले की, तुम्हारे भाडेकरूने उसके औरत का खून कर दिया तुम जलदी आवो पुलीस आये वाले है असे सांगितले त्यानंतर फिर्यादीने त्याच्या पत्नीस घरी जावून पाहणी करून खात्री करण्यास सांगितले असता त्याच्या पत्नीने सुध्दा किरायाने दिलेल्या घरी जावून पाहणी करून फोनवर फिर्यादीला कळवले की, त्यांचे भाडेकरू असलेला मिलींद नारायण पाडेवार याने त्याचे पत्नीवर चारित्र्याच्या संशयावरून त्याची पत्नी प्रतीक्षा मिलींद पाडेवार हिस सकाळी ११.०० वाजताचे सुमारास कु-हाडीने डोक्यात तिक्ष्ण घाव करून जिवे ठार मारून टाकले आहे असे कळविले म्हणुन फिर्यादी हा तात्काळ मोटार सायकल वरून परतुर येथे येवुन पोलीस स्टेशनला गेला असता आरोपी मिलींद नारायण पाडेवार यास असे का केले असे विचारणा केली असता त्याने माझी बायको नेहमी फोनवर कोणाला तरी बोलते तिची चालचलन व वागणुक चांगली नाही व मी तीला सकाळी तिला फोनवर कोणाला तरी बोलत असतांना पाहिले म्हणुन तिला घरातील कु-हाडीने पत्नीच्या डोक्यात सपासप घाव करून जिवे मारून खून केला असे फिर्यादीला सांगितले. म्हणुन सदर फिर्यादीच्या फिर्यादीवरुन पोलीस स्टेशन परतुर येथे गुन्हा कं. ५११/२०२२ कलम ३०२ भादंवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले.
सरकार पक्षातर्फे सदर प्रकरणात अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड भारत के. खांडेकर यांनी एकूण १६ साक्षीदार तपासले. त्यात फिर्यादी, पंच साक्षीदार, वैदयकीय अधिकारी व इतर साक्षीदार तसेच तपासीक अंमलदार एस. पी. पुंडगे, सहा. पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन परतुर यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. तसेच पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी एम.टी. सुरवसे, पोलीस निरीक्षक पो.स्टे. परतुर यांनी वेळोवेळी सरकारी पक्षाला मदत केली.
न्यायालयापुढे सरकारपक्षातर्फे आलेला साक्षीपुरावा व दोन्ही बाजुचा युक्तीवाद लक्षात घेवून प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना श्रीमती. वर्षा एम. मोहीते यांनी मिलींद नारायण पाडेवार, वय २५ वर्ष रा. आंबेडकर नगर, परतुर ता. परतुर जि. जालना यास पत्नीचा खून केल्या प्रकरणी कलम ३०२ भा.द.वी. मध्ये दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व दहा हजार रूपये दंड व दंड न भरल्यास सहा महिने कारावासाची शिक्षा ठोठावली.
प्रकरणात सरकारपक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता अॅड भारत के. खांडेकर यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी व जिल्हा सरकारी वकील कार्यालयातील कर्मचारी यांनी मदत केली.