पैठण संतपीठाच्या पहिल्या बॅचचा उद्या प्रमाणपत्र वितरण सोहळा, चाळीस वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद: कुलगुरु डॉ. प्रमोद येवले

औरंगाबाद, दि.८ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत संतपीठाचा, (पैठण) पहिला प्रमाणपत्र वितरण सोहळा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा.ना.चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी होत आहे. कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ होत आहे.
नाथसागरच्या पायथ्याशी अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी संतपीठ स्थापन करण्यात आले आहे. २०२१ पासून संतपीठ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठतंर्गत सुरु करण्यात आले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते १७ सप्टेंबर २०२१ रोजी संतपीठाचे लोकर्पण करण्यात आले.
या संतपीठाच्या पहिल्या बॅचचा प्रमाणपत्र वितरण सोहळा शुक्रवारी (दि.९) सकाळी १०ः३० वाजता संतपीठाच्या प्रांगणात होणार आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. रोजगार हमी योजना मंत्री, पालकमंत्री संदीपान भुमरे यांची प्रमुख उपस्थिती राहील.
यावेळी उच्च व तंत्रशिक्षण खात्याचे सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर, प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ.भगवान साखळे, संतपीठाचे समन्वयक डॉ.प्रवीण वक्ते यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
संतपीठात सध्या ज्ञानश्वरी परिचय प्रमाणपत्र (२२), तुकारात गाथा परिचय (३७), एकनाथाची भागवत परिचय (०३) व सम्रग वारकरी संप्रदाय परिचय (१२), महानुभव संप्रदाय (१८) आदी अभ्यासक्रमास २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात १४१ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. तर संतपीठात सध्या पाच अभ्यासक्रमाला मिळून १७५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत.
दरम्यान, उच्च शिक्षण विभागाचे नवनियुक्त शिक्षण संचालक डॉ.शैलेंद्र देवळाणकर यांनी कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांची गुरुवारी दि.आठ सायंकाळी सदिच्छा भेट घेती. यावेळी कुलगुरु डॉ.भगवान साखळे, सहसंचालक डॉ.सतीश देशपांड यांची उपस्थिती होती. मा.उच्च शिक्षण मंत्र्याच्या उद्घाटन दौ-यासंदर्भात तसेच संतपीठ उद्घाटन सोहळा व उच्च शिक्षण विभागाकडे विद्यापीठांचे प्रलंबित असलेले विषय याविषयी उभयतांना चर्चा झाली.
चाळीस वर्षांच्या स्वप्नपूर्तीचा आनंद : कुलगुरु
मराठवाडा ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. वारकरी संप्रदायाचा पाया रचणा-या ज्ञानदेवांवासून अनेक संतांनी प्रबोधनाची चळवळ चालविली. चाळीत वर्षांपासूनचे मराठवाडयातील जनतेचे संतपीठाचे स्वप्न साकार होत आहे. माझ्या कारकिर्दीत संतपीठाचे उद्घाटन व प्रमाणपत्र वितरण होत असल्याचा मनस्वी आनंद आहे, अशी प्रतिक्रिया कुलगरु डॉ.प्रमोद येवले यांनी व्यक्त केली. पुढील वर्षी संतपीठात ’डिप्लोमा कोर्सेस’ सुरु करण्याचा मानस आहे.