13 लोकांची शिकार करणाऱ्या वाघाला पकडले, 10 महिन्यांपासून 3 जिल्ह्यांत घातला होता धुमाकूळ !!

गडचिरोली, 13 ऑक्टोबर – महाराष्ट्रातील विदर्भातील तीन जिल्ह्यांमध्ये 10 महिन्यांत 13 जणांचा बळी घेणाऱ्या वाघाला गुरुवारी गडचिरोली येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी पकडले.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, गडचिरोलीच्या वडसा वनपरिक्षेत्रात ‘सीटी-१’ नावाचा वाघ धुमाकूळ घालत असून लोकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.
अधिकारी म्हणाले की, वाघाने १३ जणांचा बळी घेतला आहे. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरपासून वडसा येथे सहा, भंडारा जिल्ह्यातील चार आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात तीन जणांची हत्या केली होती.
त्यांनी सांगितले की, नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी ४ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीत या वाघाला पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या.
अधिकारी म्हणाले की, त्यानंतर ताडोबा टायगर रेस्क्यू टीम, चंद्रपूरची रॅपिड रिस्पॉन्स टीम, नवेगाव-नागझिरा आणि इतर युनिट्सनी वाघाला पकडण्यासाठी युद्धपातळीवर काम केले. त्यानंतर वडसा वनपरिक्षेत्रात वाघाचे दर्शन होऊन गुरुवारी सकाळी बेशुद्धावस्थेत पकडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
या वाघाला येथून १८३ किमी अंतरावर असलेल्या नागपुरातील गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये पुनर्वसनासाठी पाठवण्यात आले आहे.