रिक्षा टॅक्सी युनियनच्या प्रतिनिधींसोबत मंत्रालयात सकारात्मक चर्चा ! पार्कींग, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळासह वाहन कर्जाची मोठी समस्या !!
रिक्षा टॅक्सी चालकांनी केले समाधान व्यक्त

मुंबई, दि. 24 ; रिक्षा आणि टॅक्सी युनियनच्या प्रश्नांसाठी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंत्रालयात बैठक घेतली. रिक्षा स्टॅन्ड, पार्कींगची समस्या, चालकांचा विमा, कल्याणकारी मंडळ, महिला रिक्षा चालकांच्या समस्या, कोविड कालावधीतील दंड, वाहन कर्ज यासारख्या अनेक विषयांवर सकारात्मक चर्चा झाली.
परिवहन विभागाचे प्रधान सचिव सुबोध जयस्वाल, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंतकुमार सरंगल, वाहतूक पोलीस सहआयुक्त राजवर्धन तसेच विविध रिक्षा टॅक्सी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, उद्योगमंत्री श्री. सामंत यांच्या पुढाकाराने पंधरा दिवसांत या विषयासंबधी सातत्याने बैठका घेऊन तसेच रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या अनेक संघटनांना विश्वासात घेऊन प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक चर्चा केल्याबद्दल सरकारचे उपस्थित संघटनांच्या प्रतिनिधींनी विशेष आभार मानले.