एमआयडीसीच्या भूखंड वाटपाची स्थगिती त्वरित उठवा, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई – राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) विविध स्तरावर भूखंड वाटपाला देण्यात आलेली स्थगिती त्वरित उठवण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र लिहून केली आहे.
वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टरचा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यानंतर उद्योगांसाठीच्या जमिनीबाबत पुनर्वलोकन केलं जात असल्याचा मुद्दा समोर आला होता. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी २० सप्टेंबर रोजी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना भूखंड वाटपास दिलेली स्थगिती उठविण्यात आली असल्याचे म्हटले.
मात्र आज २२ दिवस उलटूनही भूखंड स्थगिती बाबतचा निर्णय जैसे थे आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना त्यांनी केलेल्या घोषणेची आठवण करून देत दानवे यांनी भूखंड स्थगितीबाबतचे आदेश निर्गमित न झाल्याने भूखंडाच्या निर्णयाबाबतची कार्यवाही ठप्प झाल्याचे निदर्शनास आणून दिले.
स्थगिती उठविण्याबाबतच्या निर्णयाचे आदेश निर्गमित न केल्याने वेदांता फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्पा प्रमाणे इतर प्रकल्पही अन्य राज्यात जाण्याची शक्यता अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.
राज्यातील उद्योगाला चालना मिळावी व राज्यात गुंतवणूक येऊन रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांनी यावर जातीने लक्ष घालून स्थगित उठवण्याच्या घोषणेची अंमलबजावणी करावी असे दानवे म्हणाले.