पाचोड हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई, मसाला तंबाखुसह १८ लाखांचा माल जप्त, गाडी सोडून चालक पसार !!

औरंगाबाद, दि. ८ – औरंगाबाद स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करत एकूण १७,८७,००० /- रुपयांचा मुद्देमाल सापळा रचून जप्त केला. पोलीस ठाणे पाचोड हद्दीत महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेला पान मसाला तंबाखूने भरलेला महिंद्रा पिकअप वाहनासह पकडला.
दिनांक ०७/१२/२०२२ रोजी पोलीस निरिक्षक रेंगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाने माहिती दिली की, सोलापूर ते धुळे रोडवर वाहन बोलेरो पिकअप (क्रमांक एम.एच.४० सी. डी. २६५७) मध्ये सोलापूर कडून औरंगाबाद कडे रात्रीच्या वेळी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेली सुगंधीत तंबाखु व पान मसाला येणार आहे. ही खात्रीलायक माहिती मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथक रवाना झाले.
दिनांक ०८/१२/२०२२ रोजी सकाळी ०५.३० वाजता सोलापूर धुळे रोडवर मौजे आडगाव जावळे शिवारात रोडवर पोलिसांना सापळा रचला. एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप (एम. एच. ४० सी.डी. २६५७) पाचोड कडून औरंगाबादकडे येताना दिसली. त्यास पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला असता चालकाने पिकअप रोडवर उभा करून तो अंधारात फायदा घेऊन तो शेतात पळून गेला.
त्याने सोडून दिलेल्या वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता त्यामध्ये हिरा पान मसाला एकूण ६० गोण्या, रॉयल ७१७ सुगंधीत तंबाखुच्या ३० गोण्या व बोलेरो पिकअप गाडी असा एकूण १७,८७,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील कार्यवाही कामी पोस्टे पाचोड यांचेकडे तो देण्यात आला.
ही कामगिरी मनीष कलवानीया, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, पोलीस उप निरीक्षक विजय जाधव, पो.हे.कॉ लहु थोटे, पो.हे.कॉ. श्रीमंत भालेराव, पोना नदिम शेख, राहुल गायकवाड यांनी केली.