
CHH.SAMBHAJINAGAR | – वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव शिवारात आज रोजी सकाळी साडे सहावाजेच्या सुमारास कीर्तनकार महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. ह.भ.प. संगीता अण्णासाहेब पवार (वय 50) राहणार चिंचडगाव असे घटनेतील मयत कीर्तनकार महिलेचे नाव आहे. या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ह.भ.प. संगीता पवार या चिंचडगाव येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज कन्या आश्रम येथे राहत होत्या.
शनिवारी सकाळी आश्रमातील मंदिरातील पुजारी शिवाजी चौधरी हे नेहमीप्रमाणे मंदिरात पुजेसाठी आले होते. त्यांनी ह.भ.प. संगीता पवार यांना आवाज दिला. मात्र, त्यांनी प्रतिसाद न दिल्याने मंदिराजवळील असलेल्या शेड मध्ये जाऊन बघितले असता त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या.
यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वीरगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वान पथक व फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले. उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहे.