तलावाच्या परिसरात दारूची पार्टी करणाऱ्या कॉलेजच्या तरुणांना पोलिसांनी घेतली ताब्यात
दारूबंदीच्या कायद्याखाली कारवाई

DHULE | तलावाच्या परिसरात दारूची पार्टी करणाऱ्या तरुणांना पोलिसांनी घेतली ताब्यात – रविवार म्हटलं की तरुणांसाठी पार्टीचा दिवस. त्यामुळे अनेक महाविद्यालयीन तरुण विविध प्लॅनिंग करून पार्टी करत असतात. मात्र ते तरुण पार्टीच्या नादात सार्वजनिक ठिकाणी कोणाला त्रास होईल याची कुठलीही काळजी न करता फक्त आपल्या आनंदासाठी अशा पार्टीचे आयोजन करतात. मात्र धुळ्यात सार्वजनिक ठिकाणी पार्टी करणाऱ्या तरुणांना धुळे पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.
धुळे शहरातील नकाणे तलाव परिसरामध्ये दर रविवारी आणि अन्य सुट्टीच्या दिवशी महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणात पार्टी करण्यासाठी येत असतात. यासंदर्भातली माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी लागलीच आपल्या पथकासह नकाणे तलाव परिसरात दाखल झाले. नकाणे तलावाच्या असलेल्या वृद्ध आश्रमाच्या बाजूला छोट्याशा जंगलामध्ये ही कॉलेजची तरुण मुलं दारू आणि मटनची पार्टी करत असल्याचे पोलिसांना आढळून आले. दरम्यान प्रोबेशनर डीवायएसपी सागर देशमुख आणि धुळे तालुका पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल होऊन या तरुणांना ताब्यात घेत पोलीस स्टेशनला नेण्यात आले.
दरम्यान पोलिसांनी या कॉलेजच्या तरुण मुलांसह काही अल्पवयीन मुलानाही ताब्यात घेतले असल्याची माहिती डीवायएसपी सागर देशमुख यांनी यावेळी दिली. या मुलांच्या पालकांना देखील तालुका पोलीस ठाणे येथे त्यांना समज देण्यात आली. दरम्यान काही दारू पिलेल्या मुलांवर दारूबंदीच्या कायद्याखाली कारवाई करणार असल्याची माहिती डीवायएसपी सागर देशमुख यांनी यावेळी दिली.