महाराष्ट्र
Trending

568 अंगणवाडी खोल्या बांधकामाची गरज, आतापर्यंत केवळ 24 अंगणवाडी खोल्यांचे बांधकाम ! जलजीवन मिशन कामांची स्वतंत्र समितीमार्फत 10 जानेवारीला प्रत्यक्ष गावात पाहणी: खासदार भुमरे

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा) समिती बैठक, जलजिवन मिशन कामांचा स्वतंत्र समितीमार्फत आढावा

छत्रपती संभाजीनगर, दि.२७ :- प्रत्येक घरी नळाद्वारे पाणीपुरवठा करणारी महत्त्वाकांक्षी योजना जलजीवन मिशन अंतर्गत जिल्ह्यात होत असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी एक स्वतंत्र समिती गठित करावी. तसेच या समितीने येत्या १० जानेवारीला प्रत्यक्ष गावात जाऊन कामांची सद्यस्थिती पहावी,असे निर्देश जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात ‘दिशा’ समितीचे अध्यक्ष खा. संदिपान भुमरे यांनी आज दिले. दरम्यान, जिल्ह्यात अंगणवाडी बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात ५६८ अंगणवाडी खोल्या बांधकामाची गरज असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. आता पर्यंत केवळ २४ अंगणवाडी खोल्यांचे बांधकाम हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झाले असल्याचेही सांगण्यात आले. या संदर्भात राज्य शासन स्तरावर पाठपुरावा करावा,असेही समितीने ठरविले.

जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण अर्थात दिशा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पार पडली. अध्यक्षस्थानी खासदार संदिपान पाटील भुमरे हे होते. तसेच राज्याचे इतर मागास वर्ग व बहुजन कल्याण, तसेच दुग्धविकास व उर्जा नुतनीकरण मंत्री अतुल सावे, विधानसभा सदस्य आ. प्रशांत बंब, आ. रमेश बोरनारे, आ.संजना जाधव, आ. अनुराधा चव्हाण, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिणीयार, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुनिल भोकरे, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर तसेच सर्व यंत्रणा प्रमुख आदी उपस्थित होते.

प्रारंभी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या निधनाबद्दल दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. बैठकीत केंद्रशासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, प्रधानमंत्री पीक विमा योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री आवास योजना (शहरी), स्वच्छ भारत मिशन शहरी, जलजीवन मिशन, एकीकृत बालविकास योजना, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण अभियान, समग्र शिक्षा अभियान, राष्ट्रीय स्वास्थ्य मिशन, महात्मा गांधी ग्रामिण रोजगार हमी योजना, राष्ट्रीय सामाजिक सहायता कार्यक्रम अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला.

जिल्ह्यात जलजिवन मिशन अंतर्गत झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनांच्या कामांची सद्यस्थिती जाणून घेणे आवश्यक असल्याचे मत आ. प्रशांत बंब यांनी मांडले. त्यावर झालेली कामे, प्रगतीपथावर असलेली कामे, प्रत्यक्षात सुरु न होऊ शकलेली कामे यांचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र स्थानिक समिती तयार करण्याचे निर्देश खा. भुमरे यांनी दिले. शुक्रवार दि.१० जानेवारी २०२५ रोजी प्रत्यक्ष गावात जाऊन कामांची पाहणी समिती करेल असेही निर्देश खा. भुमरे यांनी दिले. जिल्ह्यात अंगणवाडी बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यात ५६८ अंगणवाडी खोल्या बांधकामाची गरज असल्याची माहिती बैठकीत सादर करण्यात आली. आता पर्यंत केवळ २४ अंगणवाडी खोल्यांचे बांधकाम हे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून झाले असल्याचेही सांगण्यात आले. या संदर्भात राज्य शासन स्तरावर पाठपुरावा करावा,असेही समितीने ठरविले.

छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे कामाच्या सद्यस्थितीबाबतही बैठकीत चर्चा झाली. मंत्री श्री. सावे यांनी हा मुद्दा मांडला. जलवाहिन्या टाकतांना भविष्यातील देखभाल दुरुस्तीचा मुद्दा विचारात घेऊन काम करण्यात यावे,अशी सुचना त्यांनी मांडली. याबाबत राष्ट्रीय महामार्ग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, महानगरपालिका व सर्व संबंधित लोकप्रतिनिधी यांची मिळून जलवाहिनी व रस्त्याच्या कामामुळे प्रभावित होणाऱ्या गावांच्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी सोमवार दि.३० रोजी विशेष बैठक बोलवावी, असे निर्देश खा. भुमरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शाळा दुरुस्ती व सुविधांच्या विकासाचे कामे मनरेगा मधून सुरु करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती सभागृहाला दिली. जिल्ह्यात पालकमंत्री असतांनाच्या कार्यकाळात खा. भुमरे यांनी रोजगार हमी योजनांच्या कामांमध्ये सुसुत्रता आणून योजनेच्या माध्यमातून आमुलाग्र बदल ग्रामीण भागात झाला असे आ. बोरनारे यांनी सांगितले.

जिल्ह्यात केंद्राच्या विविध योजनांचा लाभ सामान्य जनतेपर्यंत पोहोचवावा. त्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे,असे निर्देश खा. भुमरे यांनी दिले.

Back to top button
error: Content is protected !!