छत्रपती संभाजीनगर शहरात 740 थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडले ! वीजबिल वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर !!
वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे मुख्य अभियंता उतरले रस्त्यावर, थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याची धडक मोहीम सुरू ! वीजबिल वसुलीसाठी महावितरणचे मुख्य अभियंता उतरले रस्त्यावर, थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्याची धडक मोहीम सुरू !

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहरात 740 थकबाकीदार ग्राहकांचे वीज कनेक्शन तात्पुरते तोडण्यात आले. वीजबिल वसुलीसाठी महावितरण ॲक्शन मोडवर असून थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याच्या महावितरणच्या धडक मोहिमेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलाचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट हे स्वत: रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्यासह वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी मोहिमेत सहभागी झाल्याने वीजबिल वसुलीस वेग आला आहे. महावितरणची संपूर्ण यंत्रणा जोमाने कामाला लागली आहे. थकबाकीदार ग्राहकही वीजबिल लगेचच भरून मोहिमेस सकारात्मक प्रतिसाद देत आहेत.
वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरण आर्थिक अडचणीत आलेली आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील शहर, ग्रामीण व जालना मंडलात महावितरणची ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांच्यासह सर्व अधीक्षक अभियंते, कार्यकारी अभियंते, उपविभागीय अभियंते, शाखा अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालयीन अधिकारी-कर्मचारीही मोहिमेत प्रत्यक्ष ग्राहकांकडे भेट देऊन थकबाकी वसुलीसाठी सरसावले आहेत. अनेक ग्राहक तातडीने बिल भरून सहकार्य करत आहेत.
तर जे ग्राहक बिल भरण्यास प्रतिसाद देत नाहीत, त्यांचा वीजपुरवठा नाईलाजास्तव खंडित करण्याची कारवाई या मोहिमेत करण्यात येत आहे. तसेच थकबाकीपोटी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही कुणी ग्राहक अनधिकृतरित्या वीज वापरत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. तरी वीजग्राहकांनी आपली वीजबिलांची थकबाकी व चालू बिले भरून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात नक्षत्रवाडी व सिटी चौक शाखा कार्यक्षेत्रात सोमवारी (30 डिसेंबर) राबवण्यात आलेल्या विशेष वसुली मोहिमेत मुख्य अभियंता पवनकुमार कछोट, वरिष्ठ व्यवस्थापक लक्ष्मीकांत राजेल्ली यांच्यासह शहर मंडलातील विविध कार्यालयांतील अभियंते, तांत्रिक कर्मचारी तसेच विविध संवर्गातील संपूर्ण कार्यालयीन अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही एकाच वेळी या मोहिमेत ग्राहकांना भेट देऊन वीजबिलांची वसुली केली.
ग्राहकांना वीजबिलाबाबत असलेल्या शंकांचे तात्काळ निरसन तसेच आवश्यक त्या ठिकाणी बिल दुरुस्त करून त्यांना जागेवरच ऑनलाईन भरण्यास महावितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रोत्साहित केले. तसेच ज्या ठिकाणी ग्राहकास वीजबिल ऑनलाईन भरण्यास अडचण होती किंवा वीजबिल भरणा केंद्र जवळ नव्हते त्यांच्याकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बिलाची रक्कम स्वीकारून अॅपद्वारे वीजबिल भरणा करून घेतला. त्यांना बिल भरल्याचा तात्काळ मोबाईलवर एसएमएस पाठविण्यात आला. या मोहिमेत शेकडो ग्राहकांनी तातडीने बिल भरून सहकार्य केले. ज्यांनी बिल भरण्यास प्रतिसाद दिला नाही, त्यांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. तसेच अनेक दिवसांपासून बिले न भरणाऱ्या काही ग्राहकांचे थेट मीटरच काढून आणण्यात आले.
सर्व वीजग्राहकांनी थकबाकीसह आपले चालू वीजबिल भरून सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.