पदव्युत्तर अभ्यासक्रमांची उद्यापासून परीक्षा, 25 हजार विद्यार्थी, 44 विषय, 74 परीक्षा केंद्र !

छत्रपती संभाजीनगर, दि.३० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या सत्र परीक्षा मंगळवारपासून दि.३१ सुरु होत आहे. चार जिल्हयात मिळून २५ हजार ४५५ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत, अशी माहिती परीक्षा व मुल्यमापन मंडळ संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली.
कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली परीक्षा व मुल्यमापन मंडळाची गेल्या महिन्यात बैठक होऊन नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे होणा-या पदवी, पदव्यूत्तर परीक्षांचे नियोजन व वेळापत्रकासह मान्यता देण्यात आली. सर्व व्यावसायिक अभ्यासक्रम, अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या सत्र परीक्षा १७ डिसेंबर पासून घेण्यात आल्या. यामध्ये बी.ए., बी.कॉम व बी.एस्सी प्रथम सत्र एनईपी पॅटर्न २०२४ परीक्षां सुरळीत पार पडली.
पदव्युत्तरसाठी ७४ परीक्षा केंद्र
पदव्यूत्तर अभ्यासक्रमांच्या दुस-या सत्र टप्प्यात या परीक्षांसाठी चार जिल्हयात मिळून केवळ ७४ केंद्रावर परीक्षा घेण्यात मान्यता देण्यात आली. यामध्ये छत्रपती संभाजीनगर – ३०, जालना – १९, बीड -१४ तर धाराशिव जिल्हयात ११ परीक्षा केंद्राचा समावेश आहे. विज्ञान व तंत्रज्ञान, मानव्यविद्या, विज्ञान व तंत्रज्ञान व आंतरविद्या शाखा असे चार शाखांमधील ४४ विषयांची परीक्षा होणार आहेत. यामध्ये एम.ए, एम.एम.एस्सी (सर्व विषय), एम.कॉम, एम.लिब, एमए (एमसीजे), बी.जे. एम.सी.ए, एम.बी.ए, एमएमएस आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे. यासाठी एकुण २५ हजार ४५५ विद्यार्थी यांनी नोंद केली आहेत. यामध्ये एम.एस्सी इलेक्ट्रॉटिक्ल केवळ विद्यार्थी तर ’एम.कॉम’च्या ५ हजार २२७ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, या सर्व परीक्षा सकाळ व दुपार अशा दोन सत्रात होणार असून परीक्षेची संपूर्ण तयारी झाली आहे, असेही डॉ.भारती गवळी यांनी सांगितले.