औरंगाबाद: रिक्षाचा संप, सिटीबसच्या पथ्थ्यावर, 45 हजार प्रवाशांचा सुरक्षित प्रवास ! शहरातील 28 मार्गांवर धावल्या 70 सिटीबसेस !!

औरंगाबाद, दि. १ : शहरातील रिक्षा चालकांनी गुरुवारी पुकारलेल्या संपाचा पार्श्भूमीवर नागरिकांनी मोठ्या संख्येने सिटीबसचा लाभ घेतला. 28 मार्गांवर 70 बसेस धावल्या असून जवळपास 45,000 प्रवाशांची सिटीबसने प्रवास केला. त्यातून सिटीबसला अंदाजे दहा लाख रुपयाचे उत्पन्न होण्याची शक्यता स्मार्ट सिटी शहर बस विभागाने व्यक्त केली. सर्व भागातून सिटीबस प्रवाश्यांनी खच्चून भरुन धावत असल्याचे दिसून आले.
शहरातील रिक्षा चालकांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी संप पुकारला होता. रिक्षाचालक संपावर गेल्यामुळे रस्त्यावर कुठेही रिक्षा प्रवाश्यांना घेऊन धावताना दिसून आली नाही. त्यामुळे प्रवाश्यांना सिटीबस शिवाय पर्याय नव्हता. सिटीबसच्या बसस्थानकावर प्रवाश्यांची गर्दी दिसून आली.
स्मार्ट सिटीकडून शहरातील 28 मार्गांवर 70 सिटीबस सुरू केल्या आहेत. सिटीबसला दररोज साडेपाच ते सहा लाख रुपयांचे उत्पन्न मिळते व 22 ते 23 हजार प्रवाशी सिटीबसचा लाभ घेत होते. गुरूवारी मात्र रिक्षाच्या संपामुळे सिटीबसला प्रवाश्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला.
सिटीबस व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिवसभरात सिटीबसने जवळपास 45 हजार प्रवाश्यांची प्रवास केला असून त्यांच्या तिकीटातून अंदाजे दहा लाख रुपयाचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. सिटीबसला सर्वच मार्गावर प्रवाश्यांची प्रतिसाद दिला. सिटीबस प्रवाश्यांनी खच्चून भरून धावल्या. लवकरच आणखी 20 बसेस धावण्याबद्दलचे नियोजन केले जात असून 90 सिटीबस पूर्ण क्षमतेने रस्त्यावर उतरणार आहे.