सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात असताना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बघ्याच्या भूमिकेत: जयंत पाटील
अरे आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात?

- वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत.
मुंबई दि. २८ ऑक्टोबर – गुजरात निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व प्रकल्प गुजरातला नेले जात आहेत आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. आमचा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवणार आहात ? असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे सरकारला केला आहे.
वेदांता फोक्सकॉन प्रकल्पापाठोपाठ आता नागपुरात येणारा एअरबस प्रकल्पदेखील महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया ट्वीटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पानंतर नागपूरमध्ये होणारा २२ हजार कोटींचा टाटा एअरबस प्रकल्प आज गुजरातला गेला. एकामागून एक मोठे प्रकल्प गुजरातला जात आहेत. महाराष्ट्रातील सध्याचे सरकार दिल्लीसमोर किती हतबल झाले आहे हे यातून स्पष्ट होते असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.
महाराष्ट्रातील सत्तांतर राज्याला वेठीस धरण्यासाठी झाले आहे का ? असा प्रश्न सध्या पडत आहे असेही जयंत पाटील म्हणाले.