
NAVI MUMBAI | नवी मुंबई गुन्हे शाखेने एक मोठी आर्थिक फसवणूक उघडकीस आणली असून, बनावट इन्कम टॅक्स अधिकारी असल्याचा बनाव करून एका महिला प्रोफेसरची तब्बल 1 कोटी 81 लाख 72 हजार 667 रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणात गुन्हे शाखेने तीन आरोपींना अटक केली असून, आरोपींना 30 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
नवी मुंबईत एका नामांकित संस्थेत प्राध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पीडित महिलेला अज्ञात व्यक्तींनी कॉल करून सांगितले की, “दिल्ली येथे तुमच्याविरुद्ध इन्कम टॅक्सची तक्रार दाखल झाली आहे. तुम्ही 8 लाख 62 हजार रुपयांची टॅक्स थकबाकी न भरता टॅक्स चोरी केली आहे”,
असा खोटा आरोप करण्यात आला. यानंतर पीडित महिलेला WhatsApp वरून CBI, ED आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बनावट कागदपत्रांची पाठवणी करण्यात आली. आरोपींनी महिलेला सांगितले की, “अमित चौधरी” नावाच्या एका आर्थिक घोटाळ्यात तुमचे क्रेडिट कार्ड सापडले आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होणार आहे. यामुळे घाबरलेल्या महिलेला, तुम्ही सध्या डिजिटल अरेस्ट आहात, अशी धमकी देण्यात आली.
त्यानंतर महिलेला सांगण्यात आले की, तिच्या संपत्तीची पडताळणी करण्यात येणार असून ती कायदेशीर असल्याचे सिद्ध झाल्यावर सर्व रक्कम परत केली जाईल. त्यामुळे महिलेला तिच्या शेअर मार्केट व इतर गुंतवणुकीसंबंधित सर्व माहिती आणि खात्यांचे तपशील देण्यास भाग पाडले गेले. या दरम्यान महिलेकडून एकूण 1 कोटी 81 लाख 72 हजार 667 रुपये आरोपींनी सांगितलेल्या सहा वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ट्रान्सफर करून घेतले.
काही दिवसांनंतर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले आणि तिने नवी मुंबई गुन्हे शाखेमध्ये तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेने तात्काळ तपास सुरू करून रमेश बाबूलाल शेठ (45), अमित दीपक तुळशीदास शहा (42), आणि राजकुमार नारंग (55) या तिघांना अटक केली. हे आरोपी विविध लोकांना डिजिटल अरेस्ट झाल्याची भीती दाखवत, बनावट सरकारी अधिकारी असल्याचे सांगून पैसे उकळत होते. नवी मुंबई पोलिसांनी या टोळीचा पर्दाफाश करत नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.