
- कारागृह हवालदार- बाजीराव पाटील याने तक्रारदार याची रजा संपण्यापूर्वी जर त्याने ५०,०००/- रूपये दिले नाहीत तर त्याच्या गैरवर्तणूकीचा अहवाल पाठवून त्यास खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात पाठवीले जाईल असा दम भरला.
पुणे, दि. 21 – शिक्षा भोगत असलेल्या कैद्याकडून चांगला अहवाल पाठवण्यासाठी 15 हजारांची लाच महिला कर्मचार्यामार्फत कॅन्टीनमध्ये घेतल्याप्रकरणी हवालदारासह महिला कर्मचार्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजीराव ज्योतीबा पाटील (वय ५४ वर्षे, पद कारागृह हवालदार, खुले कारागृह, येरवडा, पुणे) व रिहाना आसिफ सय्यद (वय ४८ वर्षे, कारागृह आवारातील कॅन्टीनमधील महिला कर्मचारी खाजगी) अशी आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तक्रारदार हे येरवडा खुले कारागृह येथे शिक्षा भोगत असून सध्या ते संचित रजेवर आहेत. त्याच्या रजेच्या कालावधीमध्ये त्यास बोलावून यातील कारागृह हवालदार- बाजीराव पाटील याने तक्रारदार याची रजा संपण्यापूर्वी जर त्याने ५०,०००/- रूपये दिले नाहीत तर त्याच्या गैरवर्तणूकीचा अहवाल पाठवून त्यास खुल्या कारागृहातून मध्यवर्ती कारागृहात पाठवीले जाईल असा दम भरला. त्यानंतर तक्रारदाराकडे ५०,०००/- रूपये लाचेची मागणी केल्याची तक्रार ला.प्र.वि. पुणे येथे करण्यात आली.
या तक्रारीची पडताळणी केली असता कारागृह हवालदार बाजीराव पाटील याने तक्रारदार याच्याकडे मागणी केलेल्या ५०,०००/- रूपये लाच रक्कमेपैकी १५,०००/- लाच रक्कम रिहाना सय्यद हिने स्वीकारल्यावर त्या दोघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास ला. प्र. वि. पुणे युनिटच्या पोलीस उप अधीक्षक शीतल घोगरे करत आहेत.
ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक अमोल तांबे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.