पडेगाव येथील अत्याधुनिक कत्तलखान्याचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश.!

औरंगाबाद, दि.२२ सप्टेंबर
पडेगाव येथील अत्याधुनिक कत्तलखान्याचे काम डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश औरंगाबाद महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. प्रशासक महोदयांनी काल अत्याधुनिक कत्तलखान्याच्या कामाची पाहणी केली व सूचना केल्या.
यात प्रामुख्याने डिसेंबर अखेरपर्यंत प्रकल्प पूर्ण करावा आणि कामाची गती वाढावी असे निर्देश दिले. सदर कत्तलखाना मेसर्स अहारा टेक्नॉलॉजी या कंपनीला बीओटी तत्वावर चालविण्यासाठी महानगरपालिके तर्फे देण्यात आला आहे. सदरील प्रकल्पाची सुरुवात सन २०१७ मध्ये झाली आहे.
याशिवाय करारनामा नुसार गुत्तेदार अल कुरेश यांचे कडून थकबाकी रक्कम त्वरित भरून घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. कामाची गती वाढविण्यासंदर्भात त्यांनी आदेशित केले की प्रकल्पाचे पीएमसी यांनी कामाचे बारचार्ट सादर करावा व दर महिन्याला कामाच्या प्रगतीचा रिपोर्ट बार चार्टनुसार सादर करावा.
संबंधित महानगरपालिकेचे अभियंता यांना प्रशासक महोदयांनी सूचना केली की त्यांनी बारचार्टनुसार काम करून घ्यावे आणि मेकॅनिकल आणि इलेक्ट्रिकल व इतर मशीनरी खरेदीचे खरेदी देयक तपासावे. यावेळी प्रकल्पाची पीएमसी अहारा यांच्या कामावर नाराजी व्यक्त करून प्रशासक महोदयांनी त्यांना नोटीस देण्याच्या आदेश दिले.
यावेळी प्रशासक महोदयांनी प्रकल्पाचा सखोल आढावा घेतला आणि सुरू असलेले बांधकामाची पाहणी केली आणि आढावा घेतला. यावेळी शहर अभियंता एस डी पानझडे ,कार्यकारी अभियंता आर एन संधा, प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शाहेद शेख,माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद व इतर अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.
अत्याधुनिक मासोळी बाजाराची पाहणी
तदनंतर प्रशासक महोदयांनी शहागंज येथील अत्याधुनिक मासोळी बाजाराची पाहणी केली आणि संबंधित ठेकेदाराला सदरील मार्केट ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याचे निर्देश दिले. यावेळी शहागंज मंडई येथील फिश मार्केटला जाणारे रस्त्यावरंचे अतिक्रमण महानगरपालिकेचे अतिक्रमण विभागाने काढून दिले आहे.
सध्या स्थितीत फिश मार्केटला जाण्यासाठी कोणतीही अडचण नाही असे यावेळी प्रशासक महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. सदरील मार्केटचे रंग रंगोटी चे काम सुरू असून सदरील काम लवकरात लवकर पूर्ण करून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात लोकांसाठी फिश मार्केट उघडे करावे असे निर्देश डॉ.चौधरी यांनी यावेळी दिले.