महाराष्ट्र
Trending

आंबेडकर चौकात सिग्नल सुटताच हॉर्न वाजवण्यावरून वाद; रिक्षाचालकाचा कारचालकावर प्राणघातक हल्ला, नाका- तोंडावर बुक्क्या मारून केले जखमी !

छत्रपती संभाजीनगर: ट्रॅफिक सिग्नल सुटल्यानंतर पुढे जाण्याच्या घाईत रिक्षाचा हॉर्न जोरजोरात वाजवण्यावरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसान मारहाणीत झाल्याची घटना आंबेडकर चौकात घडली. संतापलेल्या रिक्षाचालकाने कारचालकाला अश्लील शिवीगाळ करत त्याच्या तोंडावर व नाकावर जोरदार बुक्क्या मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, गजानन तुळशीराम बिरसने (वय ३५, व्यवसाय- व्यापार, रा. आंबेडकरनगर, गल्ली क्र. ११) हे दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी १२:४२ वाजेच्या सुमारास आपल्या चारचाकी वाहनाने बळीराम पाटील शाळेकडून आंबेडकर चौक मार्गे सिडको बस स्टँडकडे जात होते. आंबेडकर चौकात पोहोचले असता सिग्नल सुटला.

त्यावेळी त्यांच्या मागे असलेला ऑटो रिक्षा चालक सुरेश सखाराम आव्हाड (वय ३५, रा. वानखेडेनगर, N-13 हडको) हा जोरजोरात रिक्षाचा हॉर्न वाजवू लागला. यावर कारचालक गजानन यांनी “गाडीसमोर पाण्याच्या टँकर आहे, तो बाजूला गेल्यावर मी माझी गाडी पुढे घेतो,” असे म्हटले.

या साध्या बोलण्याचा राग आल्याने रिक्षाचालक सुरेश आव्हाड याने गजानन यांना शिवीगाळ केली आणि वाहनातून खाली उतरून गजानन यांच्या तोंडावर व नाकावर हाताच्या बुक्क्यांनी जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात गजानन गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सिडको पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस अंमलदार राठोड पुढील तपास करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!