छत्रपती संभाजीनगरमध्ये दारूच्या नशेत रुग्णवाहिका चालवणे महागात: ॲपेक्स हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये चालकाला नातेवाइकांनी चोपले!
जिन्सी पोलिसांत गुन्हा नोंद

छत्रपती संभाजीनगर: रुग्णाची सेवा करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन मानल्या जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा चालकच जर दारूच्या नशेत धुंद होऊन वाहन चालवत असेल, तर रुग्णांच्या जिवाचे काय? असाच एक धक्कादायक प्रकार शहर परिसरातील ॲपेक्स हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये उघडकीस आला आहे. संशयित रुग्णवाहिका चालकाने दारू पिऊन वाहन चालवल्याच्या कारणावरून संतप्त नातेवाइकांनी त्याला चांगलाच चोप दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हेडगेवार हॉस्पिटलचे सिक्युरिटी ऑफिसर योगेश दगडूबा भोसले (वय ४५, रा. निवो सिटी साईदीप फार्महाऊस मागे, मिटमिटा) यांनी याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. दि. २ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ९:०० ते ९:३० वाजेच्या सुमारास ॲपेक्स हॉस्पिटलच्या पार्किंगमध्ये रुग्णवाहिका चालक कल्याण अच्युतराव जगताप (वय ४७, रा. शिवाजीनगर, छत्रपती संभाजीनगर) हा रुग्णवाहिका घेऊन आला होता.
मात्र, त्याच्या तोंडातून आंबट-उग्र वास येत असल्याने तो दारूच्या नशेत धुंद असल्याचे तेथे उपस्थित असलेल्या रुग्णाच्या नातेवाइकांच्या लक्षात आले. मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून रुग्णाचा व इतरांचा जीव धोक्यात घातल्याने चिडलेल्या नातेवाइकांनी चालक कल्याण जगताप याला हाताच्या चापटाने मारहाण केली.
घटनेनंतर मिळालेल्या वैद्यकीय माहितीवरून (MLC) जिन्सी पोलीस ठाण्यात आरोपी रुग्णवाहिका चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक ताठे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डकले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलीस ठाणे: जिन्सी | गु.र.नं.: २२४/२०२६ | कलम: १८५ मोटार वाहन कायदा सहकलम ११५(२) बीएनएस
































