माहेरून ५ लाख रुपयांचा हुंडा घेऊन ये, तरच नांदायला ये; अन्यथा हातपाय तोडून टाकू ! बीड बायपास परिसर हादरले !!
विवाहितेची शारीरिक व मानसिक छळाची तक्रार; सासरच्या मंडळींविरुद्ध वेदांतनगर पोलिसांत गुन्हा नोंद

छत्रपती संभाजीनगर: माहेरून ५ लाख रुपयांचा हुंडा घेऊन ये, तरच नांदायला ये; अन्यथा हातपाय तोडून टाकू, अशी धमकी देत विवाहितेचा सतत शारीरिक, मानसिक व आर्थिक छळ करून तिला घराबाहेर हाकलून दिल्याचा गंभीर प्रकार शाहानगर, बीड बायपास परिसरात उघडकीस आला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून वेदांतनगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २४ जानेवारी २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत शहानगर, बीड बायपास परिसरातील सातारा येथे हा प्रकार घडला. पीडित विवाहितेला तिच्या सासूने “वेळोवेळी तू ५ लाख रुपये हुंडा तुझ्या आई-वडिलांकडून घेऊन ये, तरच नांदायला ये, परत नांदायला आलीस तर हातपाय तोडून टाकील,” अशी थेट धमकी दिली. यानंतर विवाहितीने आपल्या आई-वडिलांना फोनवरून ही हकीकत सांगितली.
माहेरहून पैसे आणण्याच्या मागणीसाठी पती शेख साद, सासू निलोफर इम्रान शेख, सासरे इम्रान शेख आणि नणंद शेख मसीरा यांनी संगनमत करून विवाहितेला सातत्याने शिवीगाळ केली व हाताने मारहाण करून अमानुष छळ केला. अखेर तिला घरातून बाहेर काढून दिले.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदाळे यांनी गुन्हा दाखल केला असून महिला पोलीस अंमलदार सज्जनवार पुढील तपास करत आहेत.
































