गुजरात सरकारकडून पावसामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 630 कोटींचे पॅकेज जाहीर, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी आटूनही शिंदे सरकारला पाझर फुटेना !

- मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 14 जिल्ह्यांतील 2,554 गावांतील सुमारे आठ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ अपेक्षित आहे,
अहमदाबाद, 28 ऑक्टोबर – गुजरात सरकारने शुक्रवारी 14 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी 630.4 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले. दरम्यान, महाराष्ट्रातीलही अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकर्यांची शेती खरडून गेली आहे. शेतात तळे साचल्यामुळे शेतकर्याच्या हाता-तोंडाशी आलेला घास लहरी निसर्गाने ओढून नेला. अशा परिस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून अजूनही ओला दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही किंवा ठोस पॅकेज जाहीर करण्यात आलेले नाही. शेजारच्या गुजरात राज्यात मात्र पॅकेज जाहीर केले.
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची तारीख केव्हाही जाहीर होऊ शकते अशा वेळी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मदत पॅकेजला मंजुरी देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. 14 जिल्ह्यांतील 2,554 गावांतील सुमारे आठ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ अपेक्षित आहे, असे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, छोटा उदयपूर, नर्मदा, पंचमहाल, नवसारी, वलसाड, डांग, तापी, सूर, कच्छ, जुनागढ, मोरबी, पोरबंदर, आणंद आणि खेडा जिल्ह्यांतील नुकसानीचे सर्वेक्षण केल्यानंतर हे पॅकेज जाहीर करण्यात आले आहे.
अधिकृत प्रसिद्धीनुसार, खरीप हंगामात ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचे ३३ टक्के किंवा त्याहून अधिक नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दोन हेक्टरसाठी ६,८०० रुपये प्रति हेक्टर दराने भरपाई दिली जाईल. यामध्ये केळी पिकाचा समावेश नाही.