मुख्य आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला 14 दिवसांची कोठडी ! सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तपासाला वेग !!

छत्रपती संभाजीनगर – बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज सकाळी पुण्यातून अटक करण्यात आलेल्या सुदर्शन घुले, सुधीर सांगळे यांना केज कोर्टाने १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. यापूर्वी खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडलाही १४ दिवसांची पोलिस कोठडी यापूर्वीच सुनावलेली आहे. खंडणी प्रकरण आणि सरपंच संतोष देशमुख कनेक्शन असल्याचे आरोप होत असल्याने पोलिस आता त्या दृष्टीने तपासाला वेग देत आहे. दरम्यान, एक आरोपी कृष्णा आंधळे हा अजूनही फरार आहे. डॉ. संभाजी वायभस यालाही संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसारच मुख्य आरोपी सुदर्शन घुले व सुधीर सांगळे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीला मदत केल्याचा आरोप डॉ. वायभसे याच्यावर आहे. वाल्मिक कराड, सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या तिघांनाही पुण्यातूनच अटक झाल्याने पुणे कनेक्शनाचीही आता चौकशी सुरु झाली आहे.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार आरोपी सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला बेड्या ठोकल्या होत्या. पुण्यात त्यांना आज सकाळी ताब्यात घेतलं होतं. बीडच्या पोलिसांनी ही कारवाई करत त्या दोघांना एसआयटीच्या स्वाधीन केलं होतं. त्यानंतर या आरोपींना केज कोर्टात हजर करण्यात आलं. त्यावेळी कोर्टाने त्यांना १४ दिवसांची कोठडी सुनावली.
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आलेली होती त्यात आता आणखी दोघांची भर पडली. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार अशी आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
दरम्यान, वाल्मिक कराड यांच्यावर केवळ पवनचक्की मालकाला २ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे. परंतू वाल्मिक कराड हा सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाचा मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. वाल्मिक कराड अटकेत असून त्यांना १४ दिवसांची सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या सुदर्शन घुले व सुधीर सांगळे या दोघा आरोपींना आज केजच्या कोर्टात दाखल आल्याने आता तपासाला वेग येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.






























