विजेच्या खांबावर काम करताना कर्मचाऱ्याला विजेचा धक्का; कर्मचारी गंभीर जखमी,वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

DHULE | – धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरातील युनिटी सर्कलजवळ एक हृदयद्रावक घटना घडली. वीज वितरण कंपनीचा एक कंत्राटी कर्मचारी विजेच्या खांबावर काम करत असताना त्याला अचानक विजेचा जोरदार धक्का बसला. या धक्क्याने तो गंभीर जखमी झाला आणि काही काळ विजेच्या खांबावरच अडकून पडला होता.
घटनेची माहिती मिळताच तात्काळ विद्युत वितरण विभाग आणि पोलीस प्रशासनाला कळवण्यात आले. त्यानंतर, पोलीस आणि विद्युत वितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या कर्मचाऱ्याला खाली उतरवण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. क्रेनच्या साहाय्याने त्याला सुखरूप खाली उतरवून तात्काळ पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी कर्मचाऱ्यावर सध्या धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना कळताच शंभर फुटी रोड परिसरात एकच खळबळ उडाली होती आणि बघ्यांची मोठी गर्दी जमली होती. या घटनेमुळे वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.