महाराष्ट्र
Trending

पीएम-सूर्यघर मोफत वीज योजनेत वीजबिल शून्य ! छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 6351 ग्राहकांनी बसवले छतावरील सौरऊर्जा संच !!

छत्रपती संभाजीनगर : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 6 हजार 351 घरगुती ग्राहकांनी 23.66 मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा संच घराच्या छतावर बसवले आहेत. घरीच वीजनिर्मिती होणार असल्याने या ग्राहकांचे मासिक वीजबिल शून्य होणार आहे.

घराच्या छतावर 1 ते 3 किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे घरगुती ग्राहकांना दरमहा सुमारे 120 ते 360 युनिट वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत मिळत आहे. सौर प्रकल्प उभारण्यासाठी विविध बँकांकडून सवलतीच्या व्याजदराने कर्जाची सोय उपलब्ध आहे. तसेच महावितरणकडून 10 किलोवॅटपर्यंतच्या अर्जांना स्वयंचलित मंजुरी देण्यात येत आहे तसेच सौर नेटमीटरदेखील उपलब्ध करून देण्यात येत आहे.

योजनेत कार्यान्वित झालेल्या सौर प्रकल्पांतून निर्माण झालेली वीज ग्राहकांना वापरता येते. शिवाय ग्राहकाची गरज भागवून वीज शिल्लक राहिल्यास महावितरणकडून ती विकत घेण्यात येत आहे. त्याची रक्कम संबंधित ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित केली जात आहे. छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून घरगुती वीजग्राहकांना एक किलोवॅटसाठी 30 हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि तीन किलोवॅट आणि त्यापेक्षा जास्त क्षमतेसाठी कमाल 78 हजार रुपये अनुदान थेट मिळत आहे.

याबरोबरच गृहनिर्माण संस्था, गृहसंकुलांसाठी विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन व सामायिक उपयोगासाठी 500 किलोवॅटपर्यंत प्रति किलोवॅट 18 हजार रुपये असे कमाल 90 लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. 300 युनिटपर्यंत मासिक वीजवापर असणाऱ्या घरगुती वीजग्राहकांसाठी ही योजना अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुमारे 25 वर्षे या सौर प्रकल्पांतून घरातील वीजवापरासाठी मोफत वीज उपलब्ध होणार आहे. त्यामुळे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत घरगुती ग्राहक व गृहसंकुलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता पवनकुमार कछोट यांनी केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!