महाराष्ट्र
Trending

अजिंठा अर्बन बॅंकेच्या महिला ऑफिसरला अश्लिल शिवीगाळ, FD ची रक्कम परत मिळत नसल्याने ठेवीदारांचा बॅंकेत संताप ! कोट्यवधी घेवून पसार झालेला सुभाष झांबड मोकाट, कर्मचाऱ्यांना मात्र धारेवर धरले !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ४ – तब्बल ९७ कोटींचा घोटाळा झालेल्या व त्यानंतर एकापाठोपाठ एक वेगवेगळे घोटाळे बाहेर येत असलेल्या अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत ठेवीदाराने आपला संताप व्यक्त केला खरा मात्र या संतापात त्याने महिला ऑफिसरला अश्लिल शिवीगाळ केल्याचा गुन्हा सिटी चौक पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे. कोट्यवधी खावून ढेकरही न देणारा बॅंकेचा चेअरमन सुभाष झांबड हा सध्या फरार आहे. इकडे ठेवीदार आर्थिक संकटात सापडले असून ते रोज बॅंकेत खेट्या मारत आहेत. त्यांना उत्तरे देता देता बॅंकेच्या अधिकारी कर्मचार्यांना नाकीनउ येत आहे. इन्शुरन्स कंपनीकडे प्रशासक आणि बॅंकेचे अधिकारी गेल्या एक वर्षापासून पाठपुरावा करत असून बहुतांश क्लेम मंजूरही झाले असून अनेकांच्या खात्यावर ५ लाखांपर्यंतची रक्कमही जमा झाली आहे. मात्र ५ लाख रुपयांच्यावर वीम्याचे कवच नसल्याने पाच लाखावरची उर्वरित रक्कम मिळत नसल्याने ठेवीदार आक्रमक होवून बॅंकेवर चालून जात आहे. यातच दि.31/12/2024 रोजी 15.25 ते 16.15 वा दरम्यान ठेवीदाराने बॅंकेत महिला ऑफिसरला अश्लिल शिवीगाळ करून धमकावल्याने बँकेच्या कर्मचार्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

या प्रकरणी महिला ऑफिसरने पोलिसांत दाखल केलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार त्या अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक बांबुगल्ली जाधवमंडी छत्रपती संभाजीनगर येथे ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्यासह बॅंकेत २० ते २५ जणांचा स्टाफ आहे. बॅंकेवर रिझर्व बैंक ऑफ इंडीयाने दि. 29/8/2023 पासून आर्थिक निर्बंध घातलेले आहे. तसेच बँकेच्या संचालक मंडळावर दि. 18/10/2023 मध्ये सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे बॅंकेचे प्रशासक डॉ. मुकेश बारहाते हे नेमलेले असून त्यांच्या देखरेखीखाली बॅंकेचा कारभार सुरु आहे.

बँकेत विनोद चौडीये (रा कॅप्टन बाबा दर्गाजवळ मोतीकांरजा छत्रपती संभाजीनगर) त्यांची पत्नी, मुलगा, आई व त्यांच्या भावाच्या नावाने फिक्स डिपॉझीट (मुदतठेव) स्वरुपात ठेवलेले आहेत. सध्या बॅंकेवर आर्थिक निर्बंध असल्याने त्यांचे मुदतठेव क्लेम इन्सुरन्स कंपनीला पाठवले प्रमाणे त्यांचे क्लेम मंजुर होवून त्यांना अंदाजे ४० लाख रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत. परंतु त्यानंतर सदर व्यक्ती बँकेत येवून महिला ऑफिसरला क्लेमची जादा रक्कम पाहिजे असे म्हणून वाद घालत होते. परंतू बँकेच्या स्टाफने त्यांना बँकेच्या नियमानुसार व इन्शुरन्स कंपनीच्या नियमानुसार रक्कम तुम्हाला भेटलेली आहे उर्वरित रक्कम तुम्हाला मिळणार आहे, असे सांगितले होते.

दिनांक 31/12/2024 रोजी सकाळी 10.00 वाजता बॅंकेत नेहमीप्रमाणे महिला व पुरुष असा स्टाफ ड्युटीवर होता. दुपारी 15.25 वाजेच्या सुमारास बँकचे खातेदार विनोद चौंडीये व त्यांचे नातेवाईक बँकेत आले. त्यावेळी विनोद चौडीये यांनी टेबलावरील प्रिंटर ढकलून दिला व मोठमोठ्याने वरिष्ठ महिला अधिकारी यांना अश्लिल भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. अन्य स्टाफलाही शिवीगाळ केली. माझे कोणीही वाकडे करू शकत नाही असे म्हणून धमकावले. माझे बॅंकेत फिक्स डिपॉझिट केलेले पैसे मला परत द्या. माझे नाव क्लेम मंजुरीमध्ये टाकून माझे पैसे मला परत मिळून द्या. आरोपीच्या पत्नीनेही चप्पलने मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ते सर्व जण बॅंकेतून निघून गेले.

याप्रकरणी बँकेच्या महिला ऑफिसर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनोद चौंडीये यांच्यावर सिटी चौक पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

दरम्यान, बँकेतील कर्मचारी हे प्रशासक मुकेश बारहाते यांच्या मार्गदर्शनानुसार अहोरात्र झटत आहे तेही ठेवीदारांसाठी मात्र, अशा पद्धतीने जर ठेवीदार बॅंकेत जावून गोंधळ घालत असेल तर बँकेत काम करण्यास कोणताही कर्मचारी जाणार नाही. शिवाय महिला कर्मचार्यांना मनास लज्जा वाटेल असा शब्दप्रयोग केल्यास महिला कर्मचारीही येथे काम करण्यास तयार नसल्याचे सूत्रांकडून समजते. ठेवीदारांनी त्यांचे म्हणने रितसर दाखल करावे, किंवा कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा, असे जाणकारांचे म्हणने आहे.

Back to top button
error: Content is protected !!