
DHULE – वाहन भाडे तत्त्वावर घेऊन दरमहा भाड्याचे आमिष दाखवून शिरपूर व परिसरातील वाहनधारकांची तब्बल २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 316(2) व 318(4) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एका आरोपीस अटक करून ९ चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.
फिर्यादी राहुल संतोष बावा (वय 27, रा. अहिल्यापूर, ता. शिरपूर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्याकडील स्कॉर्पिओ (MH04/FA0868) व बोलेरो पिकअप (MH04/AY4814) ही वाहने आरोपी मुकेश अशोक लोहार (रा. आमोदा, ता. शिरपूर) याने जानेवारी 2025 मध्ये सोनगीर टोल नजीकच्या रस्ते बांधकामासाठी भाडे तत्त्वावर घेतली. दरमहा प्रत्येकी ₹26,000 भाड्याचे आश्वासन दिले होते. सुरुवातीला एक महिन्याचे भाडे दिल्यानंतर, उर्वरित पैसे न देता वाहने परतही केली नाहीत.
तपासादरम्यान समोर आले की, आरोपीने फक्त फिर्यादीचीच नव्हे तर आणखी सहा वाहनधारकांची स्कॉर्पिओ, स्विफ्ट, सियाझ, एक्सेंट, बोलेरो अशा नऊ गाड्या भाड्याच्या बहाण्याने घेऊन त्यांची विक्री, गहाण ठेव अथवा लपवाछपवी केली.
पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीला शिरपूर येथील करवंद नाका येथे एक्सेंट गाडी (MH12/NB2395) सह ताब्यात घेतले. त्यानंतर सखोल चौकशीत त्याने उर्वरित वाहने विविध ठिकाणी लपविल्याचे उघड झाले. पोलिसांनी तीन पथकांची स्थापना करून केलेल्या शोधमोहीमेमध्ये सर्व ९ वाहने जप्त करण्यात आली, ज्यांची एकूण अंदाजित किंमत ₹20,50,000 इतकी आहे.
या यशस्वी कारवाईसाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल गोसावी तसेच पोलीस निरीक्षक परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि संदिप दरवडे व डीबी पथकातील पोहेकॉ राजेंद्र रोकडे, रविंद्र आखडमल, पोकों योगेश दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी, व इतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. शिरपूर पोलिसांनी दाखविलेल्या या कार्यक्षमतेमुळे वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, आणखी कोणी या टोळीच्या फसवणुकीचा बळी पडत असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.