वडोद बाजारच्या चोरट्याने कापसाने भरलेला टेम्पो पळवला ! सिल्लोड रोडवर पाठशिवणीच्या खेळात टेम्पो उलटला अन् चोरटा पकडला !!

जालना- घरासमोर कापसाने भरलेला टेम्पो चोरून चोरट्याने तो पळवला. टेम्पो चालू झाल्याचा आवाज ऐकताच शेतकर्याने त्याचा सिल्लोड रोडवर पाठलाग केला. पाठशिवणीच्या या खेळात टेम्पो उलटला अन् चोरटा पकडला गेला. शेख समीर शेख रज्जाक (रा. वडोद बाजार ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.
समाधान भिका राउत (वय 46 वर्ष व्यवसाय शेती रा. मालखेडा ता. भोकरदन जि. जालना) यांनी पोलिसांना दिलेल्या प्रथम माहिती अहवालानुसार, मालखेडा शिवारात शेत गट नं. 231 मध्ये शेती असून त्यामध्ये कपाशीचे पीक होते. अंदाजे 35 क्विंटल कापुस झालेला आहे. कापुस विक्रीसाठी नेणे असल्याने समाधान राऊत यांनी गावातील कौतीक जाधव यांचा टैम्पो क्रमांक MH 24 AA 3316 बोलावून दिनांक 18/12/2024 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास टेम्पोमध्ये कापूस भरुन टेम्पो हा समाधान राऊत यांनी घरासमोर उभा केला होता.
दिनांक. 19/12/2024 रोजी रात्री 12.45 वाजेच्या सुमारास समाधान राऊत झोपलेले असताना समाधान राऊत यांना त्यांच्या घरासमोर कापसाने भरलेला टेम्पो चालु झाल्याचा आवाज आला. त्यामुळे ते घराबाहेर आले तेव्हा एक अनोळखी व्यक्ती टेम्पो चालु करून सिल्लोड रोडने घेवून गेला. त्यानंतर लगेच समाधान राऊत व त्यांचा भाऊ या दोघांनी मोटार सायकलने टेम्पोचा पाठलाग केला व पिंप्रीजवळ टेम्पोला ओव्हरटेक करून त्यास टेम्पो थाबवण्यास सांगितले असता त्याने टेम्पो थांबवला नाही समोर गेल्यावर टेम्पो उलटला. त्यानंतर तो व्यक्ती तेथून पळून जावू लागला असता त्यास दोघांनी पाठलाग करुन पकडले.
त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव शेख समीर शेख रज्जाक (रा. वडोद बाजार ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर) असे सांगितले त्यानंतर समाधान राऊत यांना माहित झाले की, सदर व्यक्तीने घोडके वस्ती जाफ्राबाद रोड भोकरदन येथून दिनांक. 19/12/2024 रोजी 12.15 वाजेच्या सुमारास प्लॅटीना मोटार सायकल चोरी करून आणली व मोटार सायकल ही समाधान राऊत यांच्या घराचे बाजुलो थोड्या अंतरावर मिळून आली. त्यानंतर समाधान राऊत यांनी शेख समीर यास उपचार कामी सरकारी दवाखाना भोकरदन येथे दाखल केले. याप्रकरणी शेतकरी समाधान राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख समीर शेख रज्जाक (रा. वडोद बाजार ता. फुलंब्री जि. छत्रपती संभाजीनगर) याच्यावर भोकरदन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






























