
PANDHARPUR- छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्रीच काय ते पंतप्रधान झाले तरी आम्ही त्यांचं स्वागत करू, असा उपरोधिक टोला राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज लगावला. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आज विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी पंढरपूरला आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनात आले तर छगन भुजबळ हे तीसरे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे विधान केले होते.
त्यानंतर आज माणिकराव कोकाटे यांनीही छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री काय देशाचे पंतप्रधान झाले तरी आम्ही त्यांचे स्वागत करू, असा टोला लगावला. त्यामुळे मंत्री महाजन यांच्यानंतर कृषी मंत्री कोकाटे यांच्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे.
रोहित पवार यांच्या टिकेकडे जास्त लक्ष देत नाही. मी पूर्वी पासूनच कोट घालतो. शेतकऱ्यांचे राहणीमान व आर्थिक परिस्थिती सुधारावी, अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी कोट घालावा असं मला वाटते. रोहित पवारांना देखील कोट घालायला देऊ असं कोकाटे यांनी म्हंटले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार की, नाही हे माहित नाही. वरिष्ठचं याबाबत निर्णय घेतील. सध्या तरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा नसल्याचे ही मंत्री कोकाटे यांनी सांगितले.