महाराष्ट्र
Trending

वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ, सरपंच संतोष देशमुख खून कनेक्शन असल्याचा सीआयडीचा मोठा दावा ! कराडला 14 दिवस सीआयडी कोठडीत पाठवण्याचे आदेश !!

छत्रपती संभाजीनगर, दि. ३१- दोन कोटी रुपयांची खंडणी प्रकरणातील गुन्ह्यात फरार असलेला आरोपी वाल्मिक कराडला ३१ डिसेंबर रोजी पुण्यात दुपारी अटक करून रात्री 9.30 वाजता केज येथे आणण्यात आले. केज न्यायालयासमोर त्यास हजर केले असता न्यायाधीश पावसकर यांनी वाल्मिक कराडला 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. त्यानंतर रात्री 12.10 वाजता वाल्मिक कराड याला बीडकडे रवाना करण्यात आले असून आज, १ जानेवारी रोजी त्याची पुन्हा वैद्यकीय तपासणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळते. दरम्यान, दोन कोटींची खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड आरोपी असला तरी तो मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातला मास्टरमाईंड असल्याचा युक्तीवाद सीआयडीने कोर्टात केला.

दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेला फरार वाल्मिक कराड काल दुपारी पुण्यात शरण आला. सुमारे १२ वाजेच्या सुमारास तो शरण आल्यानंतर पोलिसांनी त्यास अटक केली. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात त्याने शरण आल्यानंतर त्यास सीआयडीने अटक केली. त्यानंतर रात्री उशीरा त्याची वैद्यकीय तपासणी करून त्यास केजच्या कोर्टात हजर करण्यात आले. तेथे दोन्ही बाजुंच्या वकीलांनी युक्तीवाद केला. कराडच्या वकीलांनी युक्तीवाद केला की कराड हा समाजसेवक असून गरीब राजकारणी आहे. त्याच्यावर कलमही चुकीचे लावण्यात आले आहे. सीआयडीच्या वकीलाने जोरदार युक्तीवाद करताना कराडवर २ कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप असला तरी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचा खून आणि खंडणी प्रकरण यात कनेक्शन आहे. याशिवाय फोनवर संभाषणही झालेले आहे. त्यामुळे तपास करण्यासाठी सीआयडी सरकारी वकीलांनी सीआयडी कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकून मा. कोर्टाने वाल्मिक कराड यास 14 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली.

दरम्यान, दोन कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडवर १५ पेक्षा ज्यास्त गुन्हे दाखल असतानाही शस्रपरवाना दिला कोणी ? हा मुद्दाही आता चौकशीच्या रडारवर आहे.

वाल्मिक कराड हा २ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणात आरोपी असला तरी मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातला तो मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे. बीड जिल्ह्यात एकप्रकारे हैदोस घालण्याचा वाल्मिक कराडवर आरोप आहे. बीड जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी खासदार बजरंग सोनवणे, आमदार प्रकाशदादा सोळंके, आमदार सुरेश धस यांनी २८ तारखेच्या मूक मोर्चाप्रसंगी वाल्मिक कराडवर प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे थेट आरोप केले. एकप्रकारे पालकमंत्रीपद हे वाल्मिक कराडला भाड्याने दिले आहे. त्यामुळे त्याची गुंडगीरी वाढत असल्याचा सूर लोकप्रतिनिधींसह लाखो मोर्चेकर्यांनी काढला होता. मात्र, वाल्मिक कराड अजूनही बेपत्ता आहे. सदरचे प्रकरण हे सीआयडीकडे असून तब्बल ९ पथकातील १५० पोलिस त्याचा शोध घेत होते. परंतू तो पुण्याच्या सीआयडीला शरण आला होता.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरुवातीला दाखल झालेला प्रथम माहिती अहवाल असा-

मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात अगदी सुरुवातीला शिवराज लिबराज देशमुख (वय 39 वर्षे व्यवसाय शेती, रा. मस्साजोग, ता. केज, जि.बीड) यांनी दाखल केलेल्या प्राथमिक अहवालानुसार, दिनांक 09/12/2024 रोजी फिर्यादी शिवराज देशमुख हे पिसेगाव येथून दुपारी 03.00 वाजण्याच्या सुमारास धारूर चौकात आले असता, तेथे गावचे सरपंच जे की फिर्यादी शिवराज देशमुख यांचे आतेभाऊ संतोष पंडितराव देशमुख हे त्यांची चार चाकी टाटा ईडिगो गाडी घेवुन धारूर चौक, दांगट पेट्रोल पंपा समोर उभे होते.

फिर्यादी शिवराज देशमुख हे गाडी जवळ गेले असता सरपंच संतोष देशमुख त्यांना म्हणाले की, तुला मस्साजोगला यायचे आहे का, फिर्यादी शिवराज देशमुख यांनी होय म्हटल्याने त्यांना त्यांनी गाडी चालवयाला बसवले. दोघे केज येथून मस्साजोग कडे जात असतांना डोणगाव फाट्याच्या पुढे आसलेल्या टोलनाक्या जवळ ते गेले असता टोलनाक्याच्या डाव्या साईडच्या शेवटच्या लाईन मधून जात असताना मधोमध समोरून एक काळ्या रंगाची स्कार्पिओ आडवी लावली.

त्या गाडीतून सहा जण खाली उतरले. त्यातील एकाने येवून फिर्यादी शिवराज देशमुख यांच्या बाजुच्या दरवाज्याची काच दगडाने फोडून गाडीत पाहिले व दुस-या (डाव्या) साईडच्या बाजुला जावून संतोष देशमुख (सरपंच) यांचा दरवाजा उघडून त्यांना खाली ओढून लाकडी काठीने मारहाण केली व त्यांना सोबत आणलेल्या काळ्या रंगाची स्कार्पिओमध्ये बळजबरीने बसवून केजच्या दिशेने निघुन गेले. सदर घटनेच्या वेळी पाठीमागे सिल्वहर रंगाची चार चाकी स्विप्ट गाडी थोड्या अंतरावर आली व केजच्या दिशेने परत निघुन गेली. त्यामध्ये काळ्या रंगाची स्कार्पिओ मधील मारेकर्यांचे साथीदार होते. दरम्यान या आशयाचा प्रथम माहिती अहवाल दाखल झाल्यानंतर या प्रकरणात नंतर खूप अपडेट झाले.

दरम्यान, सीआयडी अ‍ॅक्शन मोडवर असून सगळेच मार्ग बंद झाल्याने वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानुसार तो शरण आला.

दरम्यान, संतोष देशमुख हत्येप्रकरणी सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे या तीन फरार आरोपींसह खंडणी प्रकरणातील वाल्मिक कराड या आरोपींची बॅंक खाती गोठवली असल्याची माहिती सूत्रांकडून समजते.

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणात आतापर्यंत ४ जणांना अटक करण्यात आलेली आहे. प्रतीक घुले, विष्णू चाटे, जयराम चाटे, महेश केदार अशी त्यांची नावे आहेत. वाल्मिक कराड यांच्यावर केवळ पवनचक्की मालकाला २ कोटींची खंडणी मागितल्याचा गुन्हा आहे. परंतू वाल्मिक कराड हे या खून प्रकरणाचे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत आहे.

Back to top button
error: Content is protected !!